aditi tatkare मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण‘ योजनेच्या eKYC प्रक्रियेत महिलांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींवर आता तोडगा निघणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली असून, त्यांनी ‘लाडक्या बहिणीं’ची चिंता मिटवण्याचं आश्वासन दिलं आहे.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभार्थी महिलांना eKYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. योजनेतील पारदर्शकता आणि नियमित लाभ हस्तांतरणासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. मात्र, जेव्हापासून ही सुविधा पोर्टलवर सुरू झाली, तेव्हापासून अनेक महिलांना OTP (वन-टाइम पासवर्ड) मिळण्यात आणि eKYC पूर्ण करण्यात मोठ्या तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचं आणि चिंतेचं वातावरण होतं.
aditi tatkare मंत्री आदिती तटकरे यांची ‘एक्स’ (X) वर पोस्ट
या वाढत्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करून या समस्येवर भाष्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, OTP बाबतच्या तांत्रिक अडचणी निदर्शनास आल्या आहेत.
पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महिला व बालविकास विभागाच्या वतीने या समस्येची दखल घेण्यात आली आहे आणि यावर उपाययोजना करण्याचं काम प्रगतीपथावर आहे.
लाडक्या बहिणींना दिलासा
आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वस्त करत म्हटलं आहे: “लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन eKYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार आहे.“
या आश्वासनामुळे ज्या महिलांना तांत्रिक अडचणींमुळे eKYC पूर्ण करता येत नव्हतं, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकार तातडीने या समस्येवर काम करत असल्याने, योजनेच्या पुढील लाभांसाठी eKYC प्रक्रिया अखंडितपणे पूर्ण करता येईल, अशी अपेक्षा आहे.
लाभार्थी महिलांसाठी आवाहन: eKYC ची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यासाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर निर्धारित वेळेत आपली eKYC पूर्ण करावी.