PM Kisan Samman Nidhi केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकताच पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा २१ वा हप्ता जारी केला आहे. मंगळवार, दिनांक ७ रोजी, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतून जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा हप्ता आगाऊ स्वरूपात वितरित केला.
जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे ८.५ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट १७१ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री चौहान यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीत दिलासा
यावेळी बोलताना कृषीमंत्र्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील जनतेचे, विशेषतः शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान मान्य केले. “मी स्वतः शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या,” असे ते म्हणाले. या संकटातून शेतकऱ्यांना आणि जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून काम करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यापूर्वी, मंत्री चौहान यांनी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील २७ लाखांहून अधिक पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठीही २१ वा हप्ता जारी केला होता. आतापर्यंत चार राज्यांतील शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मोठी प्रतीक्षा PM Kisan Samman Nidhi
जम्मू आणि काश्मीरसह इतर राज्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांना हा २१ वा हप्ता मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली आहे. महाराष्ट्रातही यावर्षी अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा २१ वा हप्ता मिळालेला नाही.
हप्ता मिळण्याची नेमकी तारीख काय?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात २ ऑगस्ट २०२५ रोजी जमा झाला होता. या योजनेनुसार, प्रत्येक हप्ता ४ महिन्यांच्या अंतराने वितरित केला जातो.
यानुसार पाहिल्यास, २१ व्या हप्त्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी नोव्हेंबरमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये दिवाळीपूर्वी हा हप्ता जमा होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, कृषी मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष आता केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.